मुंबई २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : उद्योगपती रतन टाटा यांचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर गौरवण्यात आले आहे. भारताचे दिग्गज उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती :
‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा आॅस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ऑस्ट्रेलियाच्या विकासात अमूल्य योगदान तसेच मानवतेच्या हितासाठी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ऑस्ट्रेलियासह अन्य देशातील नागरीकांना हा पुरस्कार दिला जातो.
भारतासोबतच्या व्यापारविषयक संबंधांमुळे ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागला. यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांचे योगदान अतुलनीय असल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फेरेल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. त्याचबरोबर रतन टाटा यांची ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
यापूर्वी ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा पुरस्कार मदर तेरेसा, सचिन तेंडुलकर, बायोकाॅनच्या किरण मुजूमदार – शाॅ, माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी या भारतीयांना मिळाला आहे.