जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई दर्शनासाठी येणाऱ्यांच्या दृष्टीनं राणीची बाग पाहिल्याशिवाय मुंबईचं पर्यटन पूर्ण होत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राणीचा बाग या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात गेल्या वर्षी परदेशी पाहुणे आले अन् तेही मुक्कामाला.
हे पाहुणे होते, दक्षिण कोरियाहून आलेले 8 पेंग्विन. त्यांना पाहण्यासाठी राणीच्या बागेत चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली. पहिल्याच महिन्यात राणीच्या बागेचं मासिक उत्पन्न 40 लाखांवर गेलं आणि आजच्या तारखेला राणीच्या बागेचं उत्पन्न दुपटीनं वाढलंय.
मुंबई महानगरीत प्रदूषणामुळं सर्वांचीच घुसमट होतेय. त्यात पक्ष्यांच्या संख्येतही लक्षणीय घट होत चाललीय. अशा परिस्थितीत मुंबईकरांना निसर्गाच्या सान्निध्यात नेणारं असं हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग हे मुंबईचं खास आकर्षण बनलं नसतं तर, नवलच!
इ.स. 1861 मध्ये अॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेने ‘व्हिक्टोरिया गार्डन्स’ या नावाने भायखळा येथे उभारलेले हे वनस्पती उद्यान 2010 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार 286 प्रजातींचे 3000 हून अधिक वृक्ष व 853 जातींच्या वैविध्यपूर्ण वनस्पती यांनी समृद्ध आहे.
जुलै 2016मध्ये राणीच्या बागेत हम्बोल्ट प्रजातीचे आठ पेंग्विन दाखल झाले आणि वादात अडकले. विरोधकांनी तर पालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. इतकंच नव्हे तर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली. पण, न्यायालयानं ही याचिका फेटाळली.
आता हेच पेंग्विन राणीच्या बागेचं मुख्य आकर्षण ठरलीयत.
राणीच्या बागेला भेट देणाऱ्यांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून महापालिकेनं 1 ऑगस्टपासून प्रवेशशुल्कात वाढ केली. त्याचा काहीसा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला, मात्र उत्पन्न वाढतच गेलं.
कोरियासारख्या सातासमुद्रापार देशात पाहायला मिळणारे पेंग्विनला पाहण्यासाठी पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. दररोज जवळपास 5 हजार पर्यटक राणीच्या बागेतील पेंग्विन पाहण्यासाठी येतात..सुट्टीच्या दिवशी हा आकडा 15 ते 20 हजारांवर जातो.