केवळ भारतातच नव्हे तर, विदेशातही होलीकोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र, भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील गवराळा हे एक गाव आहे, जिथ मागील ३० वर्षांपासून होळी उत्सवात रंग खेळले जात नाहीत. १९८५ मध्ये गवराळा गावात हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात वास्तव्य करणारे तुकाराम दादा यांच्यासोबत राहणारे कर्मयोगी किसनबाबा अवसरे महाराज आले होते. मंदिराचं बांधकाम करताना अवसरे महाराजांनी संपूर्ण ग्रामस्थांना मूलमंत्र देत, जातीभेद नष्ट करण्यासोबतच एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहण्याची शिकवण दिली. कालांतराने १९९२ मध्ये अवसरे महाराजांचं निधन झालं आणि तो दिवस होता होळीच्या रंगपंचमीचा. महाराजांच्या निधनाने संपूर्ण ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आणि त्या दिवशी गावात कुणीही रंग खेळला नाही किंबहुना कुणाच्या घरी चुलीही पेटल्या नाहीत. तेव्हापासून आता ३० वर्षांचा कालावधी लोटला या गवराळा गावात रंगपंचमी खेळली जात नाही.
या दिवशी संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येत होळीच्या तीन दिवसात श्रमदान करतात. गाव स्वच्छ करुन गोळा झालेल्या कचऱ्याची होळी पेटवतात. यातून वृक्ष तोडीवर आळा बसवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच लोकवर्गणीतून भजन कीर्तन, पालखी सोहळा, रक्तदान, ग्रामगीता प्रवचन आणि सामूहिक महाप्रसाद करतात. किसनबाबा अवसरे महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी ग्रामस्थ होळीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करतात. वृक्ष तोडीवर आळा बसावा म्हणून सगळे गावकरी एकत्र येत संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करतात. कचरा गोळा करतात आणि त्याचं दहन करुन होळी साजरी करतात. मात्र, रंग कुणीही खेळत नाही. होळीच्या तीन दिवसात अवसरे महाराजांची स्मृती जपण्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा आयोजित करण्यात येतो. यात ग्रामगीता प्रवचन, भजन कीर्तन, पालखी सोहळा, प्रदक्षिणा, मौन श्रद्धांजली, रक्तदान, नेत्रदान शिबिराचं आयोजन करुन महाराजांना अनोखी श्रद्धांजली वाहिली जाते.