महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला आहे. याप्रकरणी त्यांनी शनिवारी राणेंना दोषमुक्त केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डब्ल्यू.उगले यांनी राणे यांची निर्दोष मुक्तता केली. पुरेसा पुरावा नसल्याने दोषमुक्त करावे यासाठी वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयामध्ये अर्ज केला होता.
17 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान महाडमध्ये पत्रकार परीषदेत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या बद्दल अवानकारक शब्द उच्चारले होते. या प्रकरणी शिवसैनिक सिध्देश पाटेकर यांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान रायगड जिल्ह्यात महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महाड शहर पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राणे यांचे अटकनाट्य मोठ्या प्रणाणात रंगले होते.