आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारीच्या मुंबई दौऱ्यामुळे हा निर्णय मागे घेतल्याचे राणा आमदार रवी राणा यांनी सांगितले. खारच्या निवासस्थानी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठण करणार असल्याचा निर्णय मागे घेतला आहे.
राज्यात जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी सकाळी ९ वाजता हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका राणा दाम्पत्यांनी घेतली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून राणा यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला. शुक्रवारी रात्रीपासून शिवसैनिक याठिकाणी ठाण मांडून बसले होते. तसेच अमरावतीमधील निवासस्थानीदेखील शिवसैनिक आक्रमक झाले. त्यामुळे राणा दाम्पत्यांना सकाळी ९ वाजता मातोश्रीवर पोहचता आले नाही.
राणा दाम्पत्यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच सत्ताधारी-विरोधक पुन्हा आमने-सामने आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. राणा दाम्पत्यांनी खार येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना, पोलिसांना त्रास होऊ नये, या उद्देशाने हे आंदोलन मागे घेतले असल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितले आहे.