Jalgaon Crime: अशोक खरात प्रकरण ताजे असताना जळगावमधून आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप समोर आला आहे. घरातील भांडणे थांबवून सुख-शांती मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने दाम्पत्याला 11.50 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील भिकमचंद जैन नगर भागात राहणाऱ्या या दाम्पत्याची फसवणूक झाली असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याला विशेष सिद्धी प्राप्त असल्याचा बनाव रचून या भोंदूबाबाने गेल्या साडेतीन वर्षांपासून या कुटुंबाला जाळ्यात ओढले होते.
साडेतीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा दाखल होऊन 3.5 वर्षे उलटली तरी संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबाने घरात समृद्धी येईल असे भासवून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. मात्र, पैसे देऊनही परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक फटका बसल्याने फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असतानाही आरोपीचा पत्ता लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पीडित महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव
पोलीस तपासात दिरंगाई होत असल्याचे पाहून पीडित महिलेने आता थेट जळगावच्या पोलीस अधीक्षकांची (SP) भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून आपली हक्काची रक्कम परत मिळवून द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. रामानंदनगर पोलीस या भोंदूबाबाचा शोध घेत असल्याचे सांगत असले, तरी अनेक वर्षे उलटूनही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अंधश्रद्धेपोटी कोणावरही विश्वास न ठेवण्याचे आवाहन यानिमित्ताने प्रशासनाकडून करण्यात येत आहे.