जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असलेले कोविंद राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले.
आज झालेल्या मतमोजणीत रामनाथ कोविंद यांना सात लाख, दोन हजार, 644 म्हणजेच एकूण मतदानापैकी 65.65 टक्के मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख, 67 हजार 314 म्हणजेच एकूण मतदानापैकी 34.35 टक्के एवढी मते मिळाली आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या 50 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक असते. केंद्रात सत्ताधारी असलेल्या एनडीएकडे स्वत:ची 48 टक्के मते होती. याखेरीज 6 विरोधी पक्षांसह ज्या 16 पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण 15 टक्के होते. त्यामुळे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात होता.