नागपूर: दरवर्षीप्रमाणे, यंदाही नागपूरमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात मोठ्या प्रमाणात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. शोभायात्रा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गाची सविस्तर पाहणी करण्यात आली असून, रस्त्यावरील दिवे, लाईट्स आणि जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे यात्रेच्या मार्गावर प्रकाशाचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे.
पाच हजार पोलीस जवान बंदोबस्तासाठी तैनात:
सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर पोलीस दलासोबतच बाहेरून एसआरपीएफ (SRPF), होमगार्ड (Homeguard) आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अतिरिक्त सैन्य बोलावण्यात आली आहे. जवळपास पाच हजार पोलीस जवान बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. विविध धर्मांचे नागरिक दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेचं स्वागत करणार असून, त्यांच्याशी समन्वय साधण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्रोनचा होणार वापर:
सुरक्षा व्यवस्थेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोभायात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन टप्प्याटप्प्याने उड्डाण करत राहतील. असामाजिक तत्वांकडून कोणताही गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. नागपूरकरांनी शांतता, सलोखा आणि अनुशासन राखत रामनवमीचा हा उत्सव साजरा करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.