राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाची शिष्टाई पुढे आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत विरोधकांचे मत जाणून घेण्यासाठी अनेक विरोधी नेत्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे.
राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीश कुमार, नवीन पटनायक यांच्याशी राष्ट्रपती निवडणुकीच्या उमेदवारांबद्दल त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी भाजपाकडून रालोआचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण अशी विचारणा करण्यासाठी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी अन्य काही नेत्यांशीही राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केली आहे. तसेच सर्वांना राष्ट्रपती पदासाठी योग्य नाव सुचवण्यास सांगितले आहे. मात्र, अद्याप राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच आता येत्या दिवसांत राजनाथ सिंह इतर पक्षनेत्यांशीही संवाद साधणार आहेत.
बुधवारी नवी दिल्लीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली. या बैठकीचे अध्यक्षपद पवारांकडे देण्यात आले त्यामुळे या बैठकीत शरद पवार भाजपाविरोधकांचे नेता बनले. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढे यावे, यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच पवारांच्या उमेदवारीला सर्वांचे सहमत झाले. मात्र, पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून पवारांनी अंग काढून घेतले आहे. भाजपाविरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करताना पवार राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरावेत अशी अनेक भाजपाविरोधकांची इच्छा होती. मात्र, शरद पवारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनण्यास नकार दिला आहे.