जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भीमा कोरेगावमधील हिंसाचार आणि त्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
राज ठाकरे कुठे गेले, असा सवालही उपस्थित होते. पण सोमवारी राज ठाकरे यांनी फेसबुकवरील पोस्टद्वारे मौन सोडले आहे. ‘लवकरच मी बॅकलॉग भरुन काढणार’ अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली असून ते आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
सोमवारी संध्याकाळी उशिरा राज ठाकरे यांनी फेसबकुवर एक पोस्ट टाकली आहे. यात ठाकरे म्हणतात, बरेच दिवस आपली भेट झाली नसल्याचे सांगत व्यंगचित्रांमधूनही आपलं बोलणं झालेले नाही.
मागील वीस दिवसांमध्ये राज्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यासंदर्भातील व्यंगचित्रांचा मोठा बॅकलॉग तयार झाल्याचे राज ठाकरे यांनी मान्य केले आहे. ‘गेल्या वीस दिवसातील घडामोडी’च्या माध्यमातून राज ठाकरे भीमा कोरेगाव, महाराष्ट्र बंद, जातीय आरोपप्रत्यारोप याबद्दल व्यक्त होणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत असल्याचे समजतंय.