जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाला काँग्रेस नेते नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मनसे कार्यकर्त्याची नितेश राणेंनी भेट घेतली.
मराठी माणसावरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा इशारा नितेश राणेंनी यावेळी दिला.
यापुढे एकही हल्ला झाला तर आमच्या कडूनही खळ्ळ खट्याक होणार. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देणार असे नितेश राणेंनी सांगीतले.
निरुपम स्वतःच्या दुकानदारीसाठी राजकारण करताहेत. फेरीवाल्यांकडून निरुपमला हप्ता जातो असा आरोपही नितेश राणेंनी केला.
मालाडमधील मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर आता मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांचं एक प्रकारे समर्थनच केले आहे.
एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल.असे म्हणत आमदार नितेश राणे मनसे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.