मुंबई : राज्यात एकीकडे विदर्भ वाढत्या उष्णतेने होरपळत असून दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज, मंगळवारी विदर्भातील 4, मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला असून मुंबईसह, पालघर आणि ठाण्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर; तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि यावल तालुक्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या वादळी पावसामुळे सुमारे 700 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी केळीची झाडे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. आधीच आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि देशांतर्गत डिझेल टंचाईमुळे केळी निर्यात प्रभावित झाली होती. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असतानाच आता या अवकाळी वादळी पावसाने संकट आणखी गडद केले आहे.
विदर्भात तीन दिवस म्हणजेच 28 मे पर्यंत तीव्र उष्ण लाटेचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अकोला जिल्ह्यांना तीव्र उष्ण लाटेच्या इशारा दिलाआहे. सोमवारपासून सुरू झालेल्या नवतपाने विदर्भात जणू आग पेटवली आहे. सलग चार दिवसांपासून 47 अंशाच्या पुढे असलेल्या ब्रह्मपुरीचा पारा सोमवारी 47.6 अंशांवर गेला. ज्यामुळे ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. नागपूरसह सहा जिल्ह्यांचे तापमान 46 अंशाच्या पुढे गेल्याने विदर्भाची भट्टी झाली असून तीव्र उष्ण लाटांनी लोकांचे अंग अक्षरशः भाजून निघत आहे. विदर्भातील 11 पैकी नऊ जिल्ह्यातील नागरिक उष्ण लाटेचा सामना करीत असून उन्हाचा पारा 45 अंशाच्या पुढे आहे
ब्रम्हपुरी 47.6
नागपूर 46.5
गडचिरोली 46.4
भंडारा 46.4
गोंदिया 46.1
चंद्रपूर 46
वर्धा 46
अकोला 45.4
अमरावती 45