नगर: नगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, पण पावसाचा मागमूस नव्हता. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात बदल जाणवला असून थंड वातावरणाचा पूर्णतः लोप झाला आहे. त्यामुळे उष्णतेने पुन्हा डोके वर काढले होते.
या अवकाळी पावसाचा परिणाम मुख्यतः द्राक्ष, आंबा आणि इतर फळबागांवर होणार असल्याची शक्यता आहे. द्राक्ष बागांवर फळे फाटण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंब्याला मोहोर आलेला असून, तो देखील गळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय कांदा आणि गहू या पिकांनाही काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी या बदलत्या वातावरणामुळे आधीच चिंताग्रस्त होते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या पिकांना वारंवार फटका बसतो आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशा प्रकारच्या बदलत्या वातावरणाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या अवकाळी पावसामुळे एकीकडे वातावरणात बदल होत असला, तरी याचा फटका थेट शेती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसणार आहे.
