Maharashtra Weather Update: येत्या 15 दिवसांत देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सून पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंद महासागर तसेच बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या विशेष हवामान स्थितीमुळे पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे आणि जागतिक हवामान मॉडेल्सच्या अभ्यासानुसार, सध्या 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) पूर्णपणे सक्रिय झाला नसला, तरी आगामी काळात 'अल निनो'चा प्रभाव रोखण्यासाठी 'पॉझिटिव्ह IOD' निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. पॉझिटिव्ह IOD ची ही निर्मिती भारतीय मान्सूनला बळ देणारी ठरणार असून, त्यामुळे कमी पावसाचा धोका बऱ्याच अंशी टळणार आहे.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बदलांमुळे पावसाला गती
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व हिंद महासागरावर चक्राकार वारे आणि पावसाच्या हालचाली कमालीच्या वेगाने वाढल्या आहेत. इंडोनेशिया आणि लगतच्या जावा बेटांजवळील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान खालावत असून खोल समुद्रातील थंड पाणी वर येत आहे. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे संपूर्ण इंडो-पॅसिफिक भागातील हवामानात वेगाने बदल घडत आहेत. त्यातच 'मॅडेन-जुलियन ऑसिलेशन' (MJO) हा विशाल हवामान पॅटर्न अनुकूल टप्प्यात आल्यामुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात घनदाट ढग जमा होऊन मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
देशात अजूनही 12 टक्के पावसाची तूट; उत्तर व पूर्व भारतात यंत्रणा सक्रिय
सध्याच्या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 66 टक्के प्रदेशात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे, तर 30 टक्के भागात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. मान्सूनची एकूण वार्षिक सरासरी गाठण्यासाठी देशाला अजून सुमारे 12 टक्के पावसाची आवश्यकता आहे. सुदैवाने, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये स्थानिक पातळीवर अल्पकालीन हवामान यंत्रणा (वेदर सिस्टीम्स) सक्रिय होत असल्याने उर्वरित तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.