जिल्ह्यात रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुठे हलका तर कुठे मोठ्या सरींची हजेरी लावली. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पैठण, गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची बॅटिंग सुरूच आहे. यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
नागपुरात सकाळी जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस बरसला. धुळवडीच्या दिवशी झालेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे रंग उडाले. या पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असे चित्रही पाहायला मिळाले.