दिल्ली १५ जुलै २०२३, प्रतिनिधी: दिल्लीतील मुसळधार पाऊस आणि यमुना नदीचा पूर यामुळे देशाची राजधानी पाण्याखाली गेली आहे. पाण्याच्या पातळीत अधिक वाढ झाल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच २०,००० पेक्षा अधिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. शेकडो लोकांनी पुलावर आसरा घेतला आहे. तर शाळा महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत.
पावसामुळे वाहतूक देखील बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना हालचाली करायला अडचणीचे होत आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे परंतु दिल्लीला पाणी पुरवणाऱ्या ३ पाणी पुरवठा केंद्रांमध्ये पाणी शिरल्यामुळे दिल्लीतील पाणी पुरवठा देखील विस्कळीत झालेला आहे.
दिल्लीतील लालकिल्ला, सचिवालय, कार्यालय, राजघाट मार्ग आदी सर्वच महत्वाच्या ठिकाणी पाणी साचले आहे. दिल्लीतील जवळपास सर्वच रस्त्यांनी तळ्याचं स्वरूप धारण केलं आहे. सर्वच रस्त्यांवर ३ फुटांएवढे पाणी साचले आहे. यामुळे अबालवृद्धांचे खाण्यापिण्याचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लाल किल्ला ते इंडिया गेटपर्यंत पाणीच पाणी झाले आहे. या मुसळधार पावसामुळे यमुना मेट्रो स्टेशनही पाण्याखाली गेले असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे दिल्लीतील व्यापारही मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेला धक्का लागण्याची शक्यता आहे.