रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची आणि पकडल्या जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केलेल्या कारवाईमध्ये यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत सुमारे 80 हजार फुकटे प्रवासी पकडले गेले असून त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये सध्या प्रवासी आणि गाडयांची संख्या झपाटयाने वाढते आहे. एकटया पुणे रेल्वे स्थानकाची आकडेवारी पाहिल्यास स्थानकामध्ये दररोज अडीचशेहून जास्त गाडयांची ये-जा असते. पुणे- लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकल गाडया आणि पुणे-दौंड मार्गावरील डेमू गाडयांमध्येही प्रवाशांची संख्या अधिक आहे.
फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याला या कारवाईचा आढावा घेतला जातो. पुणे विभागाकडून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर आदी मार्गावर तिकिट तपासणीची मोहीम राबविली.
त्यात विविध प्रकारच्या नियमांमुळे1 लाख 23 हजार 628 प्रकरणांत 7 कोटी 77 लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे 71 हजार होती. त्यांच्याकडून 4कोटींचा दंड घेण्यात आला..अश्या सर्व फुकट्या प्रवाश्यांना रेल्वेच्या नियमानुसार दंड भरावाच लागणार आहे. दंड न भरल्यास संबंधित प्रवाशाला रेल्वेच्या कायद्यानुसार तुरुंगवासाची शिक्षाही केली जाईल असा इशाराही रेल्वेने दिला आहे.