जून महिन्याच्या उत्तरार्ध रायगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून पावसाने घेतलेल्या रौद्ररुपानंतर रायगडमधील अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. रायगडच्या पेण, नागोठणे, पाली, रोहा या उत्तर भागात पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजिवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सतत सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. रायगडच्या रोह्यात पुराचे पाणी शिरले असून कुंडलिका नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा रोहा शहर आणि MIDC पारिसराला फटका बसला आहे. रोह्यातील मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आले असून घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान रोहा तालुक्यातील मेढा येथील पाण्यात काही शेतकरी अडकले होते त्यांना सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव यंत्रणांनी सुखरूप बाहेर काढले आहे. आता पर्यत 22 नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणाहुन बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले असून कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा शहराला कुंडलिका नदीच्या पुराच्या पाण्याचा घेराव आहे. त्यामुळे कुंडलिका नदी शेजारी असणारे अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकून आहेत.
तर दुसरीकडे सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली असून महाड शहर आणि परिसराला पुराचा धोका वर्तावला आहे. सकाळपासून अंबा, पाताळ गंगा आणि कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत आहे. नागोठणे, रोहा, पेण, खोपोली परिसराला पुराच्या पाण्याचा फटका बसत असताना महाडच्या सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडल्याने रायगडमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा जोर कमी झाला नाही तर संपूर्ण रायगड जलमय होण्याची शक्यता आहे.