रायगडच्या रोहा तालुक्यातील निडी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, निडी गावातील रोहित पाटील आणि तन्वी ताडकर यांच्यात प्रेमसंबंध होते. मुंबईला स्थलांतरित झालेल्या एका कुटुंबाच्या बंद घराची साफसफाई करण्यासाठी दोघे गेले होते.
त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात रोहित पाटील याने तन्वी ताडकर हिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर त्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेऊन जीवन संपविले. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती समोर येताच रोहा शहरात एकच खळबळ उडाली.
परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.