Pydhonie Case: कलिंगड नव्हे तर ‘हे’ ठरलं मृत्यूचं कारण! पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं

मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या चौघांच्या मृत्यूमागील कारण अखेर स्पष्ट झाले आहे.

Pydhonie Case: कलिंगड नव्हे तर ‘हे’ ठरलं मृत्यूचं कारण! पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं

मुंबई: मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, फॉरेन्सिक तपासणीनंतर समोर आलेल्या अहवालाने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाईट या विषारी रसायनाचे अंश आढळून आले आहेत. 26 एप्रिल रोजी पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या दोन मुली आयेशा व झैनब यांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. चौघांनी आदल्या रात्री कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर कलिंगडामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने केलेल्या तपासात वेगळंच वास्तव समोर आलं. तपासादरम्यान चौघांच्या शरीरातील नमुन्यांमध्ये तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले. हे रसायन प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते.तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना उलट्या, चक्कर येणे आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. प्रकृती बिघडल्याने त्यांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र काही वेळातच त्यांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन मुलींसह आई-वडिलांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी अत्यंत आव्हानात्मक ठरली होती. उलट्यांमधून शरीरातील मोठ्या प्रमाणातील विष बाहेर पडल्याने नमुने शोधणे कठीण झाले होते. तरीही कालिना एफएसएलच्या तज्ज्ञांनी अनेक रासायनिक चाचण्या करत या मृत्यूमागील नेमके कारण शोधून काढले. एफएसएलचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे विष चौघांच्या शरीरात नेमकं कसं गेलं? हा प्रकार आत्महत्येचा आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक विष दिलं, याचा तपास सुरू आहे. कलिंगडामध्ये हे रसायन कशा प्रकारे मिसळले गेले, याचाही शोध घेतला जात आहे.

या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका आनंदी कुटुंबाचा काही तासांत झालेला अंत अनेक प्रश्न उपस्थित करून गेला आहे. पोलिस आणि फॉरेन्सिक विभागाच्या तपासाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number