देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे. गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील काही गॅस दाहिन्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून विशेषतः वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद ठेवण्यात येणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विविध प्रकारच्या दाहिन्या उपलब्ध आहेत. यामध्ये विद्युत दाहिन्या, एलपीजीवर चालणाऱ्या दाहिन्या आणि इतर प्रणालींचा समावेश आहे. शहरात एकूण 52 दाहिन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 18 दाहिन्या एलपीजीवर चालतात, तर 10 विद्युत दाहिन्या आहेत. तसेच इतर काही प्रणालींचाही वापर केला जातो. दररोज सरासरी 112 अंत्यसंस्कार या दाहिन्यांद्वारे पार पडत असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मात्र सध्याच्या परिस्थितीत गॅसचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असल्याने एलपीजीवर चालणाऱ्या दाहिन्यांवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वापराबाबत काही धोरणात्मक बदल केल्याने एलपीजीवर चालणाऱ्या दाहिन्या व्यावसायिक वापरात येतात. त्यामुळे सध्या या 18 एलपीजी दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महापालिकेने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. एलपीजी दाहिन्या बंद असल्या तरी विद्युत दाहिन्या आणि इतर उपलब्ध प्रणालींचा वापर वाढवून अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरळीत ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर गॅस उपलब्धतेनुसार बंद असलेल्या दाहिन्या पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही महापालिकेने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये आणि संयम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.