Pune Traffic Rank: पुणे शहरातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी अत्यंत गंभीर समस्या बनली असून, पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते. 'टॉम टॉम' (TomTom) या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याने तब्बल 5 वा क्रमांक गाठला आहे. या अहवालानुसार 2025 या वर्षात पुणेकरांचे वाहतूक कोंडीमुळे तब्बल 152 तास (सुमारे 6 दिवस 8 तास) प्रवासातच वाया गेले आहेत. शहरातील रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग अवघा 18 किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला असून, एकूण ट्रॅफिकचे प्रमाण 71 टक्क्यांवर पोहोचले आहे.
अवघे 4.5 किलोमीटर जाण्यासाठी 15 मिनिटे; गर्दीच्या वेळी 10 किलोमीटरला तब्बल 41 मिनिटे
वाहतुकीच्या संथ वेगामुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अहवालानुसार, शहरात 15 मिनिटांच्या कालावधीत नागरिक केवळ 4.5 किलोमीटर इतकेच अंतर पार करू शकतात. साधारणपणे 10 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी 33 मिनिटे 20 सेकंदांचा वेळ लागतो, जो 2024 च्या तुलनेत 11 सेकंदांनी वाढला आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी (Peak Hours) 10 किलोमीटरसाठी 38 मिनिटे 13 सेकंद लागतात, तर संध्याकाळी हाच प्रवास करण्यासाठी पुणेकरांना 41 मिनिटे 40 सेकंद खर्च करावे लागत आहेत. अहवालानुसार, 16 ऑक्टोबर 2025 हा दिवस वर्षातील सर्वाधिक ट्रॅफिकचा ठरला, जेव्हा 2.7 किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी तब्बल 15 मिनिटे लागली होती.
हेही वाचा – Dahi Handi 2026: दहीहंडीपूर्वी राज्य सरकारची मोठी भेट! 1.60 लाख गोविंदांना मिळणार 10 लाखांचं विमा कवच
मेक्सिको आणि बंगळुरूनंतर पुणे जगातील आघाडीच्या ट्रॅफिक शहरांत
टॉम टॉमच्या आकडेवारीनुसार 2025 च्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात सर्वाधिक 79 टक्के वाहतूक कोंडीची नोंद झाली, तर मार्च महिना हा तुलनेने सर्वांत कमी ट्रॅफिक असणारा महिना ठरला. जागतिक पातळीवर विचार केल्यास, सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या बाबतीत मेक्सिको सिटी पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत भारतातील बंगळुरू शहर दुसऱ्या स्थानावर असून, आयर्लंडचे डब्लिन तिसऱ्या आणि पोलंडचे लॉड्झ शहर चौथ्या क्रमांकावर आहे. या जागतिक शहरांच्या पाठोपाठ 5 व्या स्थानावर पुण्याने क्रमांक नोंदवल्याने पुणेकरांच्या वाढत्या मनस्तापावर आणि शहरातील कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.