पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्यामुळे माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली असून पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात संवाद झाल्याची ऑडिओ क्लिप पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबच्या हाती तपासादरम्यान लागली आहेत.
पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी ४ ते ५ दिवस आधी संजय राठोड आणि पूजामध्ये ९० मिनिटांहून अधिक वेळ संवाद झाला असल्याचं समोर येत आहे. हे सर्व संभाषण बंजारा भाषेत झाले असून त्याचे भाषांतर केले जात आहे.
पुणे पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा फोन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. ७ फेब्रुवारीला पुण्यात राहणाऱ्या तरुणीनं राहत्या इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली. विरोधकांनी या प्रकरणी तात्कालीन वनमंत्री संजय राठोडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यानंतर संजय राठोडांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.