पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरामध्ये काल आणि आज एकूण आठ जणांचा संशयासपद रित्या मृत्यू झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विषारी दारू पिल्याने काही जणांचा मृत्यू झाला अशी चर्चा फुगेवाडी परिसरात जोर धरू लागली आहे. मात्र पाच पैकी चार जणांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा आणि एकाचा मृत्यू हा वृद्ध काळाने झाला असावा अशी प्राथमिक माहिती दापोडी पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
या मृतामध्ये अकबर पठाण या व्यक्तीला मागील 15-16 वर्षापासून दारू पिण्याचे व्यसन असून काल रात्री त्याला चक्कर आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर पाडुरंग फुगे यांचा मृत्यू वृद्ध वयामुळे नैसर्गिकरित्या झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच विजय राठोड आणि राजेंद्र राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा असा अंदाज वर्तावण्यात आला आहे. तर राजेंद्र राजपूत हे घरात बाथरूममध्ये असताना चक्कर येऊन पडले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
यात पाडुरंग फुगे (वय 57), विजय प्रकाश राठोड (वय 31) , राजेंद्र प्रकाश राठोड (वय 34), राजू रजपुत (वय 51), अकबर पठाण (वय 52), बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे अशी मृतांची नावे असून यात दोन जणांवर उपचार सुरु आहेत. याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघां जणांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
यात सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, तर अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी पोलिसांच्या चौकशीनंतर अशी माहिती समोर आली की, नागरिकांचा बेशुद्धी, चक्कर किंवा फिट आल्याने मृत्यू झाला असावा. या धक्कादायक घटनेनंतर फुगेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.