तुम्हीही बनावट ‘चितळेचे’ बळी ठरताय?

‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचं नाव वापरून सध्या बाजारात बनावट बाकरवडी विकली जात आहे

तुम्हीही बनावट ‘चितळेचे’ बळी ठरताय?

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ब्रँड ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचं नाव वापरून सध्या बाजारात बनावट बाकरवडी विकली जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. काही दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून चितळेंच्या नावाची हुबेहुब नक्कल करत चव व गुणवत्ता यामध्ये मोठा फरक असलेली बाकरवडी ग्राहकांच्या हाती दिली जात आहे. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून, चितळेंच्या विश्‍वासार्ह ब्रँडच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. 

‘चितळे स्वीट होम’ नावाने विक्रीस येणाऱ्या या बनावट बाकरवडीचे पॅकिंग अगदी मूळ चितळे बंधूंच्या बाकरवडीसारखे असून त्यावर चितळे बंधूंचा अधिकृत ई-मेल आयडी, कस्टमर केअर नंबर आणि वेबसाइट यांची नकली छपाई करण्यात आलेली आहे. या बनावट उत्पादनांमुळे ग्राहक फसले जात असून मूळ ब्रँडच्या उत्पादनाची प्रतिमा डागाळली जात आहे. यासंदर्भात चितळे बंधूंच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विश्रामबाग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रमोद प्रभाकर चितळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ‘चितळे स्वीट होम’ या नावाने बनावट बाकरवडी विकणाऱ्या कंपनीने चितळेंच्या उत्पादनांचे खोटे तपशील वापरत ग्राहकांना गंडवले. इतकंच नव्हे तर, बनावट उत्पादनांमध्ये वापरले जाणारे घटकही सखोल तपासणीअंती मूळ बाकरवडीपेक्षा सस्ते व निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चितळे बंधू मिठाईवाले हे गेल्या अनेक दशकांपासून दर्जेदार उत्पादनांमुळे ओळखले जातात. त्यांच्या उत्पादनासाठी विशिष्ट प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन केले जाते.

सध्या सोशल मीडियावरही या बनावट बाकरवडीविषयी चर्चा रंगू लागली आहे. चितळे बंधूंच्या वतीने ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बाकरवडी खरेदी करावी आणि कोणत्याही शंका आल्यास त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून संपर्क साधावा. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number