पुण्यातल्या पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत फुटलीय जनता वसाहतीजवळ कॅनलची भिंत फुटल्यानं पुण्यात हाहाःकार उडाला आहे. पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आला आहे. दांडेकर पूल आणि परिसर अक्षरशः पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे.
यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. भिंतीला भगदाड पडल्यामुळे कालव्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे खडकवासला धरणातून कालव्यात होणारा विसर्ग थांबवण्यात आला असून नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन महापौरांनी केलं आहे.
तसंच सिंहगड रस्त्यावरील वाहतूक दत्तवाडीपर्यंत थांबवण्यात आली आहे. तसेच सारबाग ते दांडेकर पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे, तर डेक्कन ते दांडेकर पूल वाहतूक पर्यायी मार्गानं वाळवण्यात आली आहे.
पुण्यातील मुठा कालवा फुटल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. गेल्या काही वर्ष या कालव्याची दुरूस्ती टप्प्याटप्याने करतं होतो. मात्र त्या ठिकाणी आज भराव खचल्यामुळे कालवा फुटला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.
मुख्य खडकवासल्या धरणातून पाणी बंद करण्यात आलं आहे, मात्र 40 ते 50 हजार लोकसंख्येच्या वस्तीत पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं आहे.