Pune Metro Project: हिंजवडी मेट्रो ‘वेटिंगवर’ ! ट्रॅक तयार, डबे आले, पण स्थानकांवर अजूनही कामे बाकी; वाचा संपूर्ण रिपोर्ट

संपूर्ण मार्गिका 2026 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता असून टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचा पर्याय विचाराधीन आहे.

Pune Metro Project: हिंजवडी मेट्रो ‘वेटिंगवर’ ! ट्रॅक तयार, डबे आले, पण स्थानकांवर अजूनही कामे बाकी; वाचा संपूर्ण रिपोर्ट

पुणेकरांच्या स्वप्नातील आणि आयटी हबला शहराशी जोडणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 (Metro Line 3) बाबत एक महत्त्वाची पण काहीशी निराशेची बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर मेट्रोने पार करण्यासाठी पुणेकरांना आता 2025 च्या अखेरपर्यंत नव्हे, तर 2026 च्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची डेडलाईन पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून प्रलंबित कामांमुळे हा विलंब होत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे 91 टक्के काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित नऊ टक्के कामाचा खोळंबा झाला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत ही संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्याचे लक्ष्य होते. मात्र, 23.3 किलोमीटरच्या या मार्गावरील 23 स्थानकांपैकी तब्बल 11 स्थानकांचे काम अजूनही अपूर्ण आहे. रुळांचे आणि पुलांचे काम जरी अंतिम टप्प्यात आले असले, तरी स्थानकांवरील सरकते जिने (एस्केलेटर), लिफ्ट, पार्किंग सुविधा आणि अंतर्गत सजावटीची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

हेही वाचा: BMC Election 2026: मुंबई पालिका निवडणुकांसाठी AIMIM सज्ज; 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

या विलंबावर मध्यममार्ग म्हणून प्रशासन आता 'टप्प्याटप्प्याने मेट्रो' सुरू करण्याच्या विचारात आहे. ज्या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तिथे 2026 च्या सुरुवातीला मेट्रो धावू शकते. मात्र, संपूर्ण 23 स्थानकांवर मेट्रो पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी आणखी किमान सहा महिने प्रतीक्षा करावी लागेल. विशेष म्हणजे, या मार्गिकेसाठी आवश्यक असलेले दोन मेट्रो ट्रेनसेट पुण्यात दाखल झाले असून त्यांच्या तांत्रिक चाचण्या (Trials) यशस्वी झाल्या आहेत, ही पुणेकरांसाठी एकमेव दिलासादायक बाब आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील जीवघेणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) फोडण्यासाठी 2021 मध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. सुरुवातीला मार्च 2025 ही मुदत होती, जी नंतर डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली. आता भूसंपादन आणि तांत्रिक कारणांमुळे ही मुदत पुन्हा पुढे जात आहे. ही मेट्रो मार्गिका 'सिव्हिल कोर्ट' स्थानकावर स्कायवॉकच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या मेट्रो लाईन एक आणि दोन सोबत जोडली जाणार असल्याने, पुणेकरांना शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनासायास प्रवास करता येणार आहे.

थोडक्यात सांगायचे तर, हिंजवडीतील आयटी प्रोफेशनल्सना ट्राफिकमुक्त प्रवासासाठी आता 'न्यू इयर' सेलिब्रेशननंतरही काही महिने धीर धरावा लागणार आहे. स्थानकांवरील सोयी-सुविधा कधी पूर्ण होतात आणि प्रशासन नेमक्या किती स्थानकांसह मेट्रोचा श्रीगणेशा करते, याकडे आता अवघ्या पुण्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Ayodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी अपडेट; अयोध्येत VIP पासवर तात्पुरती बंदी, नवीन वर्षाच्या गर्दीमुळे प्रशासनाकडून 'हा' मोठा बदल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number