जय मबाराश्ट्र न्यूज, पुणे
बारावीच्या परीक्षेत कॉपी करीत असल्याच्या संशयाने विद्यार्थिनीचे कपडे काढून तपासणी केल्याचा प्रकार लोणी काळभोर येथील एक नामांकित शाळेत घडला आहे. या प्रकरणाबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हा प्रकार लोणी काळभोर येथील एका नामांकित ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत परीक्षे दरम्यान घडला आहे. या ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य विभागाचे 125 परीक्षार्थी विश्वराज गुरुकुलमध्ये परीक्षा देत असून यांमध्ये 80 मुली आहेत. 28 फेब्रुवारी रोजी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा पेपर असल्याने सर्व विद्यार्थी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कॉलेजमध्ये पोहोचले. मुख्य प्रवेशद्वारामधून सर्व परीक्षार्थीना आत घेतल्यानंतर फक्त संबंधित कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बाजूला घेऊन मुख्याध्यापक बाविस्कर यांनी तुम्ही परीक्षेत कॉपी करत आहात. तपासणी केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेस बसता येणार नाही असे सांगितले.
त्यानंतर मुलांना व मुलींना वेगवेगळ्या खोलीत नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. मुलींची तपासणी महिलांनी केली. यावेळी त्यांच्या अंगावरील अंतर्वस्त्रे सोडून सर्व कपडे काढण्यात आल्याची माहिती मुलींनी दिली. या प्रकारानंतर सर्व पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांची भेट घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.