Bhondubaba Navnath Gawali: आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप उघड; अंगात येण्याचं ढोंग करून महिलांशी करायचा अश्लील चाळे, गुन्हा दाखल

चांडोली येथील आश्रमाशी संबंधित प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीनंतर नवनाथ गवळी याच्याविरोधात तपास सुरू आहे.

Bhondubaba Navnath Gawali: आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप उघड; अंगात येण्याचं ढोंग करून महिलांशी करायचा अश्लील चाळे, गुन्हा दाखल

पुणे: मानवी मनातील अगतिकता आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्वतःची वासना शमवणाऱ्या भोंदूगिरीचा शाप समाजाला आजही लागलेला आहे. राज्यात नाशिकचे ‘भोंदू बाबा खरात’ प्रकरण ताजे असतानाच, आता पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोली परिसरातून एका भयंकर प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. येथील ‘शिवदत्त आश्रमा’त महाराज म्हणून मिरवणाऱ्या नवनाथ गवळी याने अध्यात्माच्या नावाखाली महिलांच्या लैंगिक शोषणाचा बाजार मांडल्याचे समोर आले आहे. एका 34 वर्षीय पीडित महिलेने दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे या वासनांध भोंदूचा खरा चेहरा आता समाजासमोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मे 2025 पासून या आश्रमात दर्शनासाठी जात होती. मात्र, 17 जुलै 2025 रोजीच्या त्या पहाटेने सर्वच चित्र पालटले. मंदिरात जप करत असतानाच आरोपी नवनाथ गवळी याने या महिलेच्या विनयशीलतेचा भंग केला. “तुझ्या अंगातील दोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबावर आलेले अरिष्ट टाळण्यासाठी तुला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,” अशी अश्लील अट या नराधमाने घातली. सुरुवातीला केवळ विनयभंगाचा गुन्हा वाटणारा हा प्रकार प्रत्यक्षात शारीरिक अत्याचारापर्यंत पोहोचला असल्याची धक्कादायक कबुली आता पीडितेने दिली आहे.

या भोंदू बाबाची कार्यपद्धती अत्यंत विळखा घालणारी होती. आश्रमात येणाऱ्या महिलांच्या ‘अंगात येण्याचे’ थोतांड रचून, त्यांच्या मनात आपण कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाखाली आहोत, असे भासवले जात असे.

हेही वाचा: Iran In World Cup : युद्धभूमीवर तणाव, पण स्टेडियममध्ये जल्लोष; इराणचा विश्वचषकातील सहभाग निश्चित

एकदा का महिलेच्या मनावर ताबा मिळवला की, मग ‘दोष निवारण’ करण्याच्या नावाखाली हा नराधम महिलांचे शोषण करत असे. सामाजिक प्रतिष्ठेपोटी आणि आरोपीच्या दहशतीमुळे अनेक पीडिता यापूर्वी गप्प राहिल्या असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अलीकडच्या काही प्रकरणांमधून प्रेरणा घेत या महिलेने अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आहे.

दुर्दैवी बाब म्हणजे, खेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन कित्येक दिवस उलटले तरी आरोपी नवनाथ गवळी अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. तो जाणीवपूर्वक न्यायालयाच्या तारखांना अनुपस्थित राहून कायद्याचा अपमान करत आहे. आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेचे संपूर्ण कुटुंब सध्या प्रचंड दडपणाखाली वावरत आहे. “आम्ही देवाच्या चरणी गेलो होतो, पण या माणसाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला,” अशी आर्त हाक पीडितेने दिली आहे. गुन्हेगार मोकाट असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत बोलताना भोंदूबाबा नवनाथ गवळी याने त्याच्यावरील आरोप जाणूनबुजून करण्यात आल्याचा दावा केला आहे. खरात प्रकरणानंतर मुद्दाम हा विषय पुढे आणला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी दिली आहे.

राज्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे दावे प्रशासनाकडून केले जातात, परंतु ग्रामीण भागातील हे विदारक वास्तव काही वेगळेच सांगत आहे. धर्माच्या नावाखाली चालणारा हा क्रूर खेळ थांबवण्यासाठी केवळ कायद्याचा धाक असून चालणार नाही, तर सामाजिक जागृतीचीही तितकीच गरज आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन सखोल तपास करावा आणि या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकलेल्या इतरही महिलांना समोर येण्यासाठी निर्भय वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. 

हेही वाचा: Ashok Kharat Case: न्यायाधिशांच्या ‘त्या’ प्रश्नावर खरातने जोडले हात; स्वत:ची बाजू मांडताना नेमकं काय म्हणाला? वाचा सुनावणीत काय काय झालं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number