भोर-नसरापूर येथील साडे तीन वर्षाच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्याला काल हादरवून सोडणाऱ्या घटनेचे अतिशय तीव्र पडसाद भोर आणि नसरापूर परिसरात उमटले. नसरापूर येथे चार वर्षे मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नातेवाईक आक्रमक झाले असून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या मांडला. जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. दरम्यान नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल 3 तास रास्ता रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मयत चिमुरडीच्या वडिलांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर संवाद साधला. आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल, प्रकरणाचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टात लढवला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतरही आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होती.
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिची हत्या केली. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत असून नसरापुरातील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यानंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्यात आलं आहे.
त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर संपलं असून वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली. सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता त्या नराधमाला पुढे काय शिक्षा होते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.