पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर सुट्टी घालवायला आजीच्या घरी गेलेल्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना 1 मे रोजी घडली असून या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नसरापूर येथे चार वर्षे मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नातेवाईक आक्रमक झाले असून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी पुण्याच्या नवले पुलावर आणि पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या मांडला. दरम्यान हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नसरापूर 4 वर्षीय चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत अभिनेते प्रवीण तरडे आक्रमक झाले आहेत. उद्या त्या नराधमाचे एन्काऊन्टर झाले तरच मानू हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहे.. अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा.. असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. एन्काऊंटर झालं नाही तर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, असा थेट इशारा देत प्रवीण तरडे यांनी आक्रमक पोस्ट केली आहे.
पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं
जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका चिमुरडीच्या नातेवाईकांनी घेतली. नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. 3 तास रास्ता रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी मयत चिमुरडीच्या वडिलांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर संवाद साधला. आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल, या प्रकरणाचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टात लढवला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपीला कठोर शिक्षा करणार असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यानंतर पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्यात आलं आहे. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर संपलं असून वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं.