जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू लवकरच जमीनदोस्त होणार आहे. ही वास्तू पाडून त्यावर बहुमजली थिएटर उभारण्यात येणार आहे. त्यात विविध आकारांच्या सुसज्ज थिएटर्ससह मुबलक पार्किंग आणि जागतिक पातळीवरील मनोरंजनाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सादर केले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील नाट्यगृहासाठी या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास. पुण्यातील सांस्कृतिक पंढरी, कलाकारांचे माहेरघर अशा विविध बिरुध्दांनी ओळखल्या जाणार्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या अंदाजपत्रकात तब्बल 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सद्या अस्तित्वात असलेली बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडून त्याठिकाणी नवीन बहुमजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी विविध आकाराची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किग, मनोरंजनाच्या विविध सुविधा करून बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहोळ यांनी दिली.
बालगंधर्व रंगदिराची वास्तू ही पन्नास वर्षांहून अधिक जुनी आहे. बालगंधर्व रंगमंदिराने नुकताच सुर्वणमहोत्सव साजरा केलाय. याठिकाणी सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे आयोजन सुरू होते. गेल्या काही वर्षांत राजकीय कार्यक्रमांची संख्याही त्यात वाढली होती, त्यामुळे या रंगमंदिराच्या तारखा मिळणे अवघड होऊन बसले आहे. म्हणूनच नवी इमारत करताना हा प्रश्न उद्भवणार नाही, याची खबरदारी घेऊन व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता निव्वळ सांस्कृतिक केंद्र तयार व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त होतीय.बालगंधर्व ही केवळ एक वास्तू नसून त्यात सांस्कृतिक इतिहासाचं एक पर्व दडलंय. त्यामुळे अनेकांना हा परिसर समृद्ध करतो. इथं येणाऱ्या अनेकांचं ‘बालगंधर्व’शी भावनिक नातं तयार झालंय.