जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अद्याप इतर फरार आहेत. डेक्कन परिसरात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास बिल्डर देवेंद्र शहा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात शहा गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
डेक्कन परिसरातील प्रभात रोडवरील गल्ली नंबर 8 मध्ये शहा यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारीच हा प्रकार घडला. गोळीबार करणाऱ्या दोन्ही दुचाकीस्वारांनी तोंडाला रुमाल बांधला होता. याप्रकरणी रात्री उशिरा डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे.