मुंबई, १९ जून २०२३ , प्रतिनिधी : मुंबईत एकीकडे सिमेंटचे जंगल म्हणजे उंचच उंच टॉवर उभारले जात आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेकडून पर्यावरण समतोल साधण्यासाठी ठिकठिकाणी अल्पावधीत निर्माण केलेल्या ‘मियावाकी’ जंगलाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ या कार्यक्रमात उल्लेख करून जाहीर कौतुक केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची आणि मुंबईकरांची मान उंचावली आहे. मुंबई महापालिकेने उद्यान खात्यामार्फत २०२० पासून मुंबईत ६० ठिकाणी ‘मियावाकी’ जंगले विकसीत केली आहेत. त्यात चार लाख झाडे आहेत. तसेच आणखी १२ ठिकाणी देखील असे जंगल तयार करण्याचे काम सुरू असून, त्याद्वारे नवीन १ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांमुळे मुंबईकरांना शुद्ध हवा मिळत आहे.
सन १९६९ पासून, डॉ. अकिरा मियावाकी यांनी संपूर्ण जपानमधील वनस्पतींचा अभ्यास करून छोटी छोटी रोपटे लावून त्यांची नीटपणे देखभाल व जोपासना करून रूपांतर झाडांत व झाडांचे रूपांतर वनांत करून मोठमोठी वने विकसित केली आहेत. ही झाडे पाच वर्षांनंतर चार मीटर, दहा वर्षांनंतर आठ मीटर आणि २५ वर्षांनी २० मीटरपर्यंत वाढतात आणि तीन वर्षांनी नैसर्गिकरित्या वैविध्यपूर्ण जंगल वाढते. तसेच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण होते आणि जमिनीचे धूप होण्यापासून संरक्षणही होते. मुंबईत अवतीभवती सदा हिरवळ बहरलेली असावी या हेतूने मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून येत्या वर्षभरात मुंबईत विविध ठिकाणी २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे हरित मुंबईसाठीच्या मुंबई मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबईतील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशनकडून “जागतिक वृक्ष नगरी ” हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबईला मिळाला आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबई महापालिका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. याशिवाय मियावाकी वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.