नाशिक जिल्ह्यात दुष्काळामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. कांद्याचे पीक खराब झाल्याने बाजारामध्ये कांद्याची आवक घटली आहे. परिणामी उन्हाळी कांद्याचे भाव सुमारे एक हजार रुपये प्रति क्विंटलने वाढले आहेत.
लासलगाव आणि नाशिक बाजार समितीमध्ये कांदा किमान 1651 रुपये तर कमाल 2000 रुपये प्रति क्विंटलने विकला गेला आहे. तब्बल सात ते आठ महिन्यानंतर कांद्याला 2 हजार रुपये भाव मिळत आहे. उन्हाळी कांद्याची जास्त दिवस साठवून ठेवण्याची क्षमता देखील संपली आहे, त्यामुळे कांद्याला कोंब येऊन कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे.
दुष्काळामुळे नवीन कांद्याचं पीकही खराब झाले असून पुढील महिनाभर नवीन कांदा येत नाही, तोपर्यंत भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. तसंच कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या भागातील कांदाही खराब झाला असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. परिणामी भाव वाढत आहे.
सध्या लाल आणि उन्हाळी कांदा दोन्हीची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे, मात्र ज्या दिवशी आवक वाढेल त्या दिवशी दर देखील कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कांद्याचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांचा फार काही फायदा होतोय अशी परस्थिती नाही. कारण पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं आहे. पुढील काळात अजून कांद्याचे भाव वाढणार असल्याने येणाऱ्या काळात कांदा ग्राहकांना रडवणार असं अंदाज व्यक्त होत आहे.