पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी असं पुण्यातील बैठकीत अजीत पवार यांनी सुचना दिल्या आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात. आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. अशी पुर्वतयारी करण्यात आली आहे.
पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाय करावेत, सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करावे. आळंदीला वाहनतळासाठी जागा संपादन करावे, त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. सोपानदेव पालखी मार्गावरील रस्त्यातील खड्डे जिल्हा परिषदेने त्वरित बुजवावे. पालखी मार्गावरील शासकीय जागेची सुविधेच्यादृष्टेने माहिती घेऊन अशा जागा पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरुपी आरक्षीत करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी सांगितले. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.