बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयातील उपचारातील कथित हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही तब्बल 19 तास मृत भ्रूण महिलेच्या पोटातच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पीडित महिलेचे पती वैजनाथ मुंडे यांनी संबंधित डॉक्टरांविरोधात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी तसेच परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा जीव गेला, तसेच त्यानंतरही महिलेच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून तिच्याही जीवाशी खेळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी वेळेत योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर परिस्थिती गंभीर असतानाही मृत भ्रूण बाहेर काढण्यासाठी विलंब करण्यात आला. जवळपास 19 तास मृत भ्रूण पोटातच ठेवल्यामुळे महिलेची प्रकृती अधिक बिघडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने अखेर कुटुंबीयांनी अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाला आळा बसावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे परळी शहरात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस आणि आरोग्य विभाग या तक्रारीची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.