विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. शासकीय भूखंडांच्या १ हजार कोटी घोटाळा प्रकरणी दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील वांद्रे येथील बॅंडस्टॅण्डजवळील भूखंड विक्रीच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी पत्रातून केली आहे.
वांद्रेतील बॅंडस्टॅण्ड येथील ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी एक एकर पाच गुंठे शासकीय मालकीचा भूखंड आहे. हा भूखंड कवडीमोल किमतीत देण्यात आला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे या भूखंडाच्या व्यवहाराप्रकरणी विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
शसकीय भूखंड विक्रीचे प्रकरण गंभीर आहे. तसेच खासगी विकासकाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक बेकायदेशीर कामे करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत शासकीय भूखंडाच्या १ हजार कोटी घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.