कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करून या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन प्रणित मोरे अडचणीत सापडला आहे. मोरे याच्यासह हिमांशू जांगडा, डॉ. सेजल पवार यांच्या विरोधात महाराष्ट्र सायबरनं गुन्हा दाखल केला आहे. या वादानंतर प्रणित मोरेने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते. आता त्याने समोर येत सर्वांची माफी मागितली आहे.
व्हिडीओ शेअर करत प्रणित म्हणाला की, “नमस्कार, हे मला गेल्या काही दिवसांपासूनच बोलायचं होतं.पण माझं इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं होतं. तुम्ही सगळ्यांनी माझा एक व्हिडिओ पाहिला असेल, त्यावरून माझ्यावर खूप टीका होतेय. आणि मला असं वाटतंय की, या टीकेला एका अर्थी मी पात्रच आहे. कारण मी त्या मुलाशी संवाद साधत होतो तेव्हा त्याच्या बऱ्याच गोष्टी अपमानास्पद चुकीच्या होत्या, मला हे थांबवता आलं असतं, पण सगळेच त्याच्यावर हसत होते, त्यामुळे मी ते संभाषण पुढे नेलं”.
पुढे तो म्हणाला की, “ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. काही गोष्टी माझ्या हातात होत्या, मी त्याला तिथेच थांबवू शकलो असतो, त्याच्या विरोधात बोलू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही. या सगळ्या प्रकरामुळं ज्यांच्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो. कायदेशीर कारवाई सुरू आहे, त्यात मी सहकार्य करतोय. पण माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की, कृपया मला एक संधी द्या. मी चांगला माणूस म्हणून समोर येईन. माझ्यासाठीही हा धडा होता. मी स्वत:मध्ये सुधारणा करेन, माझ्या कंटेंटवरही लक्ष देईन. भविष्यात तुम्हाला हे बदल दिसून येतील”, असं प्रणितनं म्हटलं आहे.