धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धान बोनसची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी धान बोनस वितरणाबाबत महत्त्वाची माहिती देत, बोनसची रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रफुल पटेल यांनी सांगितले की, धान बोनस देण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने विधानसभेत अधिकृतपणे केली आहे. त्यानंतर बोनस वितरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण थेट चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय नागपूर-भंडारा दौऱ्यादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बोनसच्या निधीबाबत आणि वितरण प्रक्रियेबाबत सरकार सकारात्मक असून, शेतकऱ्यांना कोणताही विलंब होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकरी अनेक दिवसांपासून बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष निधी कधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र प्रफुल पटेल यांच्या ताज्या वक्तव्यानंतर बोनस वितरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता राज्य सरकारकडून बोनस वितरणाची अंतिम तारीख आणि निधी वाटपाबाबत अधिकृत आदेश कधी जारी होतो, याकडे राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.