सांगली, १० मे २०२३, प्रतिनिधी : संपूर्ण देशात 7 मे रोजी नीटची परीक्षा पार पडली. परंतु या परीक्षेसाठी सांगलीत गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत उलटे कपडे घालून परीक्षेला बसविण्याचा अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पालकांचा भडका उडाला असून सांगलीतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सांगलीत एक अत्यंध धक्कादायक, घृणास्पद आणि लाजिरवाणा प्रकार घडला आहे. 7 मे रोजी नीटच्या परीक्षेला आलेल्या या विद्यार्थीनींना चक्क त्यांचे अंगावरील कपडे उलटे परीधान करायला सांगितले. हा सगळा प्रकार जेव्हा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांचा चांगलाच भडका उडाला. संतापलेल्या पालकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत थेट तक्रार केली.
नेमकं काय घडलं सांगलीत?
सांगलीत असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी नीटच्या परीक्षेकरिता आले होते. पण परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. सांगलीतील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली असून आलेल्या विद्यार्थ्यांना अंगावरील कपडे उलटे परीधान करायला सांगितले. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना देखील परीक्षेला बसण्यासाठी आधी त्यांचे कपडे आणि अंतरवस्त्र उलटे परिधान करायला लावले असा आरोप आता काही विद्यार्थ्यांनी केलाय. या परीक्षा केंद्रात येणाऱ्या विद्यार्थिनींचे तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करायला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालूनच परीक्षा द्यावी लागली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उलटे कपडे घालून परीक्षा दिली. या सूचनेआधी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर या सूचना देण्यात आल्या.
परंतु, परीक्षा संपल्यानंतर उलटे कपडे परीधान केलेल्या अवस्थेतच या मुलांनी घरची वाट धरली. केंद्राबाहेर आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावरील उलटे कपडे पाहून पालक संभ्रमात पडले. त्यांनी याबाबतचे कारण आपल्या पाल्यांना विचारणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रकार करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, कस्तुरबा वालचंद महाविद्यालयाने या परीक्षेशी कॉलेजचा काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही फक्त वर्ग उपलब्ध करून दिले आहेत, असं महाविद्यालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता हा प्रकार कुणाच्या आदेशाने घडला? कशासाठी या सूचना दिल्या? कोणी सूचना दिल्या? असा सवाल उपस्थित झाला आहे.