जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कुर्ला रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बलाच्या निलंबित उपनिरीक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. रेल्वे सुरक्षा बलाचे निलंबित उपनिरीक्षक रमेश विठ्ठल मेश्राम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रमेश मेश्राम यांचे वय 50 वर्षे आहे. गेले तीन दिवस ते सायनच्या टिळक रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आहेत.
रमेश मेश्राम हे माटुंगा येथे कार्यरत असतांना कारशेडमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणाबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या कुर्ला येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होती. ही सुनावणी संपल्यानंतर काही वेळातच ते बाहेर आले आणि कुर्ल्याच्या फलाट क्रमांक 1 वर येत असलेल्या लोकल समोर त्यांनी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.