जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
अवघ्या महाराष्ट्रात ठिकठकाणी 12 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. नागपुरमध्ये सकाळी 7 वाजल्या पासूनच फुटाळा तलावात बाप्पाला निरोप
द्यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती गणपतींचे विसर्जन करण्याचे शासनाने आदेश दिलेत. त्यानंतर 4 वाजल्यापासून मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन
करण्यात येईल.
विसर्जनासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. भाविकांना सिंथेटिक टॅंकची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जे
शाडूमातीचे गणपती आहेत त्यांना तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे. नागपूरमध्ये विशेषत: वेगवेगळे 5 तलाव आहेत, त्यामध्ये सोनेगाव
आणि सक्करदरा या 2 तलावांमध्ये विसर्जनासाठी मनाई करण्यात आली आहे.
नागपूरच्या या सर्व तलावांनजीक सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. त्याद्वारे पोलिस या विसर्जन सोहळ्यावर नजर ठेवून आहेत. प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त
करण्यात आला आहे. जवळजवळ 4000 सुरक्षाकर्मी ठिकठिकाणी तैनात केलेत. राज्य राखीव दलाच्या तुकड्यादेखील नागपूरच्या रस्त्यांवरती सज्ज झाल्या आहेत.
पर्यावरणाचा ऱ्हास तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे.