जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गुरूवारी मुंबईच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांना चोर-पोलिसांचा खेळ बघायला मिळाला. एक चोर प्रवाशाचा मोबाईल चोरून पळत होता, ज्याला आरपीएफ च्या जवानांनी पाठलाग करून पकडलं, ही संपूर्ण घटना कुर्ला स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
गुरुवारी सकाळी 10 वाजता पनवेलला जाणारी गाडी हार्बर लाईनच्या फलाटावर लागली. गाडी जशी सुटली तसा एका मोबाईल चोराने, प्रवाशाचा मोबाईल चोरला आणि धुम ठोकली. प्रवाशी चोर चोर ओरडला खरा पण चोराच्या पाठी पळणे त्याला जमले नाही, सुदैवाने फलाटावरील आरपीएफच्या जवानांनी त्याचं ओरडणं ऐकल आणि मग सुरू झाला चोर पोलिसांचा खेळ.
पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी या चोराने ट्रॅक वर उडी घेतली आणि पळू लागला मात्र जीवाची पर्वा न करता आरपीएफचे जवान देखील ट्रॅक वर उतरले आणि अखेर या चोराला त्यांनी पकडले. यावेळी प्रवाश्याचा मोबाईल चोराकडून जप्त करण्यात आला.