त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये सामाजिक तेढ पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अमरावतीत अफवा पसरवणाऱ्या तीन व्हॉट्सऍप ग्रुपमधील सदस्यांमधील सात जणांना पोलिसांनी अटक केले आहे.
अमरावतीमध्ये १२ आणि १३ तारखेला मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागून अमरावतीमधील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या हिंसाचारप्रकरणी मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असल्यामुळे अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा सात दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. मात्र तरीही अमरावतीमध्ये काहींनी अफवा पसरवली. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्या तीन व्हॉट्सऍप ग्रुपमधील सात सदस्यांना पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी अटक केली आहे.
अमरावती हिंसाचारप्रकरणी बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले होते. तसेच या बंदमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे, महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे.