वाशी तालुक्यातील पारगाव येथे 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना' अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यात येणारा पौष्टिक खाऊ उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांजरा नदीच्या पुलाजवळ तब्बल 18 बॉक्स आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांना नदीपात्राजवळ मोठ्या प्रमाणात बॉक्स पडलेले दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बॉक्सवर "महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग" तसेच "प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना" असा स्पष्ट उल्लेख असल्याचे आढळले. बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले पीनट बटर, मिक्स फ्रूट आणि चॉकलेट फ्लेवरचे मिलेट्स न्यूट्रिटिव्ह बार असल्याचे दिसून आले.
या साठ्याचे विद्यार्थ्यांपर्यंत वाटप झाले नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, नियोजित वेळेत वितरण न झाल्यामुळे हा खाऊ रात्रीच्या अंधारात नदीपात्राजवळ टाकून देण्यात आला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या घटनेमुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी शासनाकडून पुरविण्यात आलेला खाऊ अशा पद्धतीने वाया जाणे हा शासकीय निधीचा अपव्यय असल्याची टीका होत आहे. नागरिक आणि पालकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सध्या हा साठा नेमका कोणत्या शाळेसाठी पाठविण्यात आला होता, तो विद्यार्थ्यांना का वाटण्यात आला नाही आणि तो नदीपात्राजवळ कोणी टाकला, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संबंधित पुरवठादार, शाळा प्रशासन आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणीही पुढे येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पीएम पोषण योजनेच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी असलेला पौष्टिक आहार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी उघड्यावर फेकला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.