Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या नावावर आणखी एक जागतिक पुरस्कार! स्वीडनकडून सर्वोच्च सन्मान मिळाल्याने भारताचा अभिमान दुणावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीडन दौऱ्यात त्यांना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या नावावर आणखी एक जागतिक पुरस्कार! स्वीडनकडून सर्वोच्च सन्मान मिळाल्याने भारताचा अभिमान दुणावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप दौऱ्याचा दुसरा टप्पा रविवारी स्वीडनमध्ये सुरू झाला. गोटेबर्ग येथे पोहोचताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. स्वीडन सरकारने मोदींना देशातील प्रतिष्ठेचा ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ हा सर्वोच्च सन्मान बहाल करत भारत-स्वीडन संबंधांना नवे बळ दिले. या सन्मानामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नावावर आता 31 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नोंद झाली आहे.

पंतप्रधान मोदींचे विमान स्वीडनच्या हवाई हद्दीत दाखल होताच स्वीडिश हवाई दलाच्या ग्रिपेन लढाऊ विमानांनी त्यांना सुरक्षा कवच दिले. विमानतळापर्यंत लढाऊ विमानांची साथ मिळणे हा मोठा राजनैतिक सन्मान मानला जातो. यामधून यजमान देश पाहुण्या नेत्याला किती महत्त्व देतो, हे स्पष्ट होते. या दृश्यामुळे भारतीय समुदायामध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा: US Iran Nuclear Talks : ‘युरेनियम हस्तांतरणासह..’ अमेरिकेने अणुकरारासाठी इराणसमोर ठेवल्या ‘अशा’ अटी; आता स्थिती चिघळण्याचीच शक्यता

विशेष म्हणजे स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन स्वतः गोटेबर्ग विमानतळावर उपस्थित राहून नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना दिसले. सामान्यतः अशा स्वागतासाठी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात, मात्र स्वीडनच्या पंतप्रधानांनी स्वतः विमानतळावर जाऊन स्वागत केल्याने या भेटीचे महत्त्व अधोरेखित झाले.

स्वीडनने पंतप्रधान मोदींना दिलेला ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार, कमांडर ग्रँड क्रॉस’ हा सन्मान त्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानला जातो. भारत आणि स्वीडनमधील संबंध अधिक मजबूत करणे, जागतिक सहकार्य वाढवणे आणि विविध क्षेत्रांतील भागीदारीला गती देणे या योगदानासाठी मोदींना हा सन्मान देण्यात आला. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी यांची ही स्वीडन भेट जवळपास आठ वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारत-नॉर्डिक शिखर परिषदेसाठी त्यांनी स्वीडनचा दौरा केला होता. त्यामुळे यावेळीही दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत आहे.

हेही वाचा: P Chidambaram on Narendra Modi : देशाच्या आर्थिक धोरणांवरून पी. चिदंबरम यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र; परदेशी गुंतवणुकीसह महागाईच्या मुद्द्यावरून विचारले ‘हे’ कडक प्रश्न

स्वीडनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायानेही मोदींचे उत्साहात स्वागत केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वीडिश ऑपेरा गायिका शार्लोटा हल्ड यांनी ‘वैष्णव जन तो’ हे लोकप्रिय भजन सादर केले. याशिवाय भरतनाट्यम नृत्य आणि बंगाली संस्कृतीची झलक दाखवणारे कार्यक्रमही सादर करण्यात आले. भारतीय संस्कृतीचा रंग स्वीडनमध्ये पाहायला मिळाल्याने उपस्थित भारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते.पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि युरोपियन देशांमधील संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number