दिल्ली, १३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सोशल मीडियावरील डीपी बदलून राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. देशाप्रतिचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी जनतेला हे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी १३ ऑगस्ट ट्वीट करुन देशासोबतचं नातं अधिक दृढ करण्यासाठी जनतेला हे पाऊल उचलण्यास सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,
“हर घर तिरंगा” या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडिया खात्यांचा डीपी बदलू आणि या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊ ज्यामुळे आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील.” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन केलंय. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावरील अकाऊंटचा डीपी बदलला असून आता त्यांच्या डीपीवर तिरंगा ध्वजाचा फोटो आहे.