केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. मात्र, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील एका लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून ही आर्थिक मदत आहे की आमची थट्टा? असा सवाल शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. योजनेतील रक्कम अपेक्षित प्रमाणात न मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर चौकशीची मागणी होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तपास करून योग्य तो खुलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. त्यामुळे आता सरकार यासगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.