गाडीत 2,000 व 2,000 हून अधिक रक्कमेचे पेट्रोल भरणार असाल तर सावधान व्हा. कारण UPI पेमेंटवरील शुल्काला पेट्रोल पंप चालकांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी UPI बंद करण्याचा इशारा दिला असून, राज्यासह देशभरातील अनेक पट्रोल पंप मालकांनी देखील हाच सूर लावला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर खिशात रोख रक्कम ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारावर प्रस्तावित असलेल्या सुमारे 5 रुपयांच्या Merchant Discount Rate (MDR) ला त्यांचा विरोध आहे.पंप चालकांचे म्हणणे आहे की, जर प्रत्येक मोठ्या व्यवहारावर 5 रुपये मोजावे लागले तर दिवसभरात ही रक्कम हजारोंमध्ये जाते. याचा थेट भुर्दंड त्यांच्या खिशाला बसतो. त्यामुळे 2000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट स्वीकारणार नाही, तर अशा व्यवहारांसाठी फक्त रोख रक्कम (Cash) स्वीकारली जाईल, असा पवित्रा पेट्रोल पंप मालकांनी घेतला आहे. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोल पंपावर जाताना सोबत कॅश ठेवावी, असे आवाहन केले जात आहे.
पेट्रोल पंप मालकांची नेमकी भूमिका काय?
पेट्रोल पंप डीलर्सच्या मते, पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर आधीच त्यांना अत्यल्प नफा (कमीशन) मिळतो. अशातच आता UPI पेमेंटवरील MDR च्या रूपाने त्यांच्या खिशाला कात्री लावली जात आहे.आधीच नफा कमी असताना हा अतिरिक्त आर्थिक बोजा आम्ही का सहन करायचा, असा सवाल डीलर्स उपस्थित करत आहेत. तसेच कर्नाटकमधील पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केंद्र सरकारला पत्र लिहून पेट्रोल पंप व्यावसायिकांना MDR शुल्कातून पूर्णपणे वगळण्याची मागणी केली आहे.
युपीआयवरील सुधारीत MDR शुल्काला मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी विरोध केला आहे. पेट्रोल पंप चालकांना या शुल्कातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकर निर्णय न झाल्यास येत्या 15 ऑक्टोबरपासून दोन हजारांवरील युपीआय पेमेंट बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना खिशात रोख रक्कम ठेवावी लागणार आहे